पोलिसांवर चाकू उगारून जिवे मारण्याची धमकी साजापूरच्या तरुणांची गुंडगिरी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी घटना रेल्वेस्टेशन चौकात घडली आहे. दुचाकीवर बनावट नंबर टाकून फिरणाऱ्या संशयिताची चौकशी करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर एकाने थेट चाकू उगारून जिवे मारण्याची धमकी दिल्याने भरचौकात मोठा थरार निर्माण झाला. हा प्रकार सोमवारी (दि. २९) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य
कैलास गायकवाड (वय २२, रा. साजापूर) आणि त्याचा साथीदार मोसीन घुणावत शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांवरच झालेल्या या थेट हल्ल्यामुळे शहर पोलिसांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाहतूक शाखेचे अंमलदार पर्वन हराळ, पातोडे आणि सुंदर्डे हे रात्री आठच्या सुमारास रेल्वेस्टेशन ट्रॅफिक पोलिस चौकीजवळ ड्यूटीवर होते. त्यांनी संशयास्पद
वाटलेली दुचाकी (एमएच-२०-एफएक्स-७२२२) थांबवून ई-चालान मशीनवर तपासली. तेव्हा त्या गाडीचा मूळ नंबर (एमएच ५७-ए-२१७४) असल्याचे समोर आले. पोलिसांनी या बनावट नंबरबाबत जाब विचारून दंडात्मक कारवाई सुरू करताच आरोपी चैतन्यने भरचौकात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने वाहतुकीला अडथळा ठरेल, अशा रीतीने गाडी उभी करून
पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत खिशातील चाकू काढला. मला सोडा, नाही तर तुम्हाला मारीन किंवा स्वतःचा गळा कापेन, अशी धमकी देत त्याने भररस्त्यात राडा केला. विशेष म्हणजे त्याचा साथीदार मोसीन हा या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवत होता. अंमलदार पातोडे यांनी चैतन्यच्या हातातील चाकू जप्त केला. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार प्रभाकर शिरसाठ पुढील तपास करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions